अनेक जणांना गव्हाच्या पिठाची किंवा ग्लूटेन ची ऍलर्जी (Gluten Allergy) असते, म्हणून त्यांना गहू आणि गव्हाच्या उत्पादनांना पर्याय शोधणे आवश्यक आहे. बाजरी (Pearl millet) हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात, बाजरी ही बाजरी खिचडी, बाजरीची रोटी, बाजरी लापशी, उकडपेंडी आणि इतर सारख्या अनेक पारंपारिक स्वादिष्ट पाककृतींचा मुख्य घटक आहे. चला तर मग, जाणून घेऊया बाजरीच्या पिठाची उकडपेंडी ची ही खास, सोपी रेसिपी!
आधी बाजरी विषयी आणखी जाणून घेऊया
जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले, बाजरीचे फायदे अत्यंत प्रभावशाली आहेत. बाजरीचा उगम आफ्रिकेत झाला आणि त्यानंतर भारतात त्याची ओळख झाली. या पिकाच्या लहान बिया पांढऱ्या, राखाडी, पिवळ्या, तपकिरी आणि निळसर-जांभळ्या रंगात उपलब्ध असतात. बाजरीची चव किंचित गोडसर असते.
बाजरीचे आरोग्यासाठी फायदे
- ग्लूटेन-मुक्त पर्याय
- वजन पाहणाऱ्यांसाठी बाजरी
- बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते
- रक्तदाबाची पातळी राखते
- मधुमेहामध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करते
- 6 छोट्या बाळांसाठी एक परिपूर्ण अन्न
- अँटिऑक्सिडंट्स चे भरपूर प्रमाण.
- हाडांची ताकद सुधारते
- हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले अन्न
- सुधारित दृष्टी आणि डोळ्यांचे आरोग्य
- तुमच्या शरीराला अनिमियापासून वाचवते
- त्वचे साठी उपयुक्त
तर अशा या अनेक फायदे असणारा बाजरी चा स्वादिष्ट पदार्थ आपण बनवणार आहोत आणि या पदार्थात शेंगदाणे, दही, कढीपत्ता ,जिरे यासारखे इतरही पौष्टिक घटक थोड्या- थोड्या प्रमाणात आहेतच! तर पदार्थ तर नक्कीच चविष्ट आणि पौष्टिक बनणार यात शंकाच नाही तर वळूया आपल्या आजच्या रेसिपी कडे.
पदार्थ बनविण्यासाठी लागणारा वेळ -१५ मिनिटे
साहित्य ( 2 व्यक्तीसाठी) – बाजरीच्या पिठाची उकड्पेंडी
- १ वाटी बाजरीचे पीठ
- १ कांदा
- १ टमाटर
- २ छोटे चमचे दही
- १/२ छोटा चमचा जिरे
- १/२ छोटा चमचा मोहरी
- १ छोटा चमचा लाल तिखट
- १/२ छोटा चमचा हळद
- २-३ लसून पाकळ्या
- तेल गरजेनुसार
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर
- कढीपत्ता ५-६ पाने
- शेंगदाणे चवीनुसार
व्यक्तीसंख्येनुसार साहित्याचे प्रमाण वाढवावे
बनविण्याची विधी – बाजरीच्या पिठाची उकड्पेंडी
प्रथम पण मध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, लसून, कढीपत्ता,शेंगदाणे घालून थोडावेळ फोडणी तडतडू द्यावी.
त्यानंतर बारीक कापलेला कांदा ,टमाटर घालून परतून घ्यावा.
त्यानंतर त्या मिश्रणात हळद ,लालतिखट,मिठ व बाजरीचे पीठ घालून व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यावे.आणि चांगले लालसर भाजून घ्यावे.
भाजल्यानंतर मीठ व दही व थोडेसे पाणी घालून व्यवस्थित एकत्र करावे.
त्यानंतर कढई वर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ निघेपर्यंत आतील मिश्रण शिजू द्यावे.
पाच मिनिटांनी झाकण काढून आतील मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यावे. शेगडी (Stove) बंद करावी.
वरून कोथिंबीर कांदा घालून अत्यंत पौष्टिक अशी गरमागरम उकड्पेंडी खाण्यासाठी तयार आहे!
आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.