सणासुदीचा काळ असो किंवा घरगुती कार्यक्रम, लाडवांचा साज कधीही कमी पडत नाही. महाराष्ट्रातील पारंपरिक मिठाईंपैकी नाचणी आणि फूटाण्याचे लाडू खास आहेत. हे लाडू स्वादिष्ट तर असतातच, पण त्यात पौष्टिकतेचा खजिनाही भरलेला असतो. नाचणी हे कॅल्शियम, आयर्न आणि फायबरने समृद्ध धान्य आहे, तर फूटाणे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. विशेष म्हणजे, या लाडवांची रेसिपी अतिशय सोपी आणि कमी साहित्य लागणारी आहे. काहीच वेळात तुम्ही या पौष्टिक आणि चविष्ट लाडवांचा आनंद घेऊ शकता. चला तर मग, जाणून घेऊया नाचणी आणि फूटाण्याच्या लाडवांची ही खास, सोपी रेसिपी!
नाचनीला इंग्रजीत Finger millet म्हणतात. नाचणीचे शास्त्रीय नाव एल्युसिन कोराकाना (Eleusine coracana) आहे. नाचणी ला हिंदीत मेधुवा सुद्धा म्हणतात.
नाचणी / Finger millet
नाचणीला सुपरफूडचा टॅगही देण्यात आला आहे. नाचणी हे दररोज खाल्ल्या जाणाऱ्या धान्यांचा एक प्रकार आहे जे विशेषतः भारत, नेपाळ श्रीलंका, थायलंड आणि आफ्रिकेतील काही विशिष्ट ठिकाणी पिकवले जाते. भारतात नाचणीची लागवड मुख्यता दक्षिण भारतात केली जाते. नाचणी या वनस्पतीची उंची सुमारे 2 ते 3 फूट असते. नाचणी आकाराने अतिशय लहान असून तिचा रंग लाल असतो. कमी सुपीक जमिनीतही नाचणीची चांगली लागवड करता येते.
नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगली असतात. नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण आणि अमिनो ॲसिडही चांगल्या प्रमाणात असते. नाचणी पचन सुधारण्यासाठी, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हाडे आणि दात निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगले कार्य करते. नाचणी हे ग्लूटेन मुक्त धान्य (Gluten-free grains) आहे, याचा अर्थ ज्यांना ग्लूटेनची ऍलर्जी आहे तेही नाचणीचे सेवन करू शकतात. ग्लूटेन ऍलर्जी असलेले लोक गहू, बार्ली आणि त्यांचे पीठ खाऊ शकत नाहीत, परंतु ते नाचणीचे पीठ खाऊ शकतात.
फुटाणे/ Roasted Gram
फुटाणे म्हणजेच रोस्टेड ग्राम (Roasted Gram), भाजलेले चणे किवा हरभरा. साधारणपणे लोक स्नॅक्सच्या स्वरूपात खातात. मात्र या फुटाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. फुटण्याच्या सालीमध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे फुटाणे खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. फायबर असल्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो त्यामुळे लवकर भूक लागत नाही.
फुटण्याचे आणखी काही फायदे म्हणजे, फुटाण्यांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे अनेकदा वजन कमी करण्यासाठी (weight loss) फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. फुटण्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय फुटाणे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हृदयासाठीही ते फायदेशीर आहे. फुटाण्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल (Bad cholesterol) सुद्धा कमी होते.
गुळ /Jaggery :
उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात.
गुळ खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
हिमोग्लोबिन वाढवते, स्त्रियांसाठी उपयुक्त, रक्तदाब नियंत्रित ठेवतो, पचनशक्ती सुधारते, लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करते. आयुर्वेदात गुळाचे खूप महत्व आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधेही गुळाबरोबर दिली जातात.
साहित्य – नाचणी आणि फूटाण्याचे लाडू
- नाचणी चे पीठ – दोन वाट्या
- फुटाणे– एक वाटी
- गुळ – दिड वाटी
बनविण्याची विधी- नाचणी आणि फूटाण्याचे लाडू
- सर्वप्रथम नाचणीचे पिठ व्यवस्थितपणे तव्यावर भाजून घ्यावे.
- त्यानंतर फुटाणे व्यवस्थित स्वच्छ करून त्याची बारीक पावडर करून घ्यावी.
- भाजलेले नाचणीचे पीठ व फुटाण्याची पावडर एकत्र करून घ्यावी.
- त्यानंतर गुळ व्यवस्थित रित्या कुटून घ्यावा.
- त्यानंतर कढई मंद आचेवर ठेवून गरम झालेल्या कढईत बारीक केलेला गुळ टाकून थोडा वितळू द्यावा त्यातच एकत्र केलेले नाचणी व फुटाण्याचे पीठ मिसळून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून गस बंद करावा.
- मिश्रण थोडे कोमट असतानाच हाताला थोडे तूप लावून त्याचे लाडू वळून घ्यावे.
तर तयार आहेत आपले पौष्टिक लाडू!
आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.