करटोली ची भाजी_ Spiny gourd curry
करटोली, Image Credit: https://en.wikipedia.org/wiki/File:Erumapaval.JPG

करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध  होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच करटोली. करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘काटवल’, ‘कंटोळा’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही स्थानिक नावे आहेत. या रानभाजीचे शास्त्रीय नाव मोमॉर्डिका डायोइका (Momordica dioica) असे असून इंग्रजी भाषेत करटोलीला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ (Wild Karela Fruit) असे म्हणतात. चला जाणून घेऊया या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट पण पौष्टिक करटोली ची भाजी कशी बनवायची.

ही रान भाजी  वर वर दिसायला जरी काटेरी दिसत असली तरी म्हणतात ना काय भुललासी वरलिया रंगा ! त्याचप्रमणे या भाजीच्या वर वरच्या रंग व स्वरूप न बघता यातील औषधी गुणधर्म  घरातील  लहानांपासून मोठ्या  मंडळी करिता सुद्धा लाभदायक आहे. पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे. त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्‍य खावी.

तर आज आपण बनवूयात चना डाळ घालून करटोली ची भाजी. सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात  हि भाजी पोळी किंवा भाताबरोबर सहज खाता येईल. चला तर मग हि भाजी बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूया!

बनविण्यासाठी लागणारे साहित्य- करटोली ची भाजी

  1. हिरवी कोवळी करटुली(wild karela)-पाव किलो
  2. भिजलेली चना डाळ(yellow lentil split) -अर्धा वाटी
  3. ओले खोबरे(coconut )-अर्धी वाटी,
  4. बारीक चिरलेला कांदा(onion)- एक वाटी,
  5. हिंग(asafoetida)-चिमुटभर
  6. मोहरी(mustard seeds)-अर्धा छोटा चमचा
  7. मीठ(salt)-१ चमचा  
  8. जिरे(cumin seeds)-अर्धा छोटा चमचा
  9. हळद(turmeric powder) – अर्धा छोटा चमचा
  10. चिरलेल्या हिरव्या मिरच्या(green chilly)-दोन
  11. लाल तिखट(red chilli powder)-१ चमचा
  12. साखर(sugar)-चिमुटभर
  13. तेल(edible oil)-३ चमचे 

बनविण्याची विधी- करटोली ची भाजी

  • करटुल्यांचे अर्धे भाग करून त्यातील बिया व गर काढून टाकावा. नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटुली चिरून घ्यावीत.
  • शेगडी वर कढई चढवून कढई गरम झाल्यावर त्यात ३ चमचे तेल सोडावे
  • हिंगाची  जिरे व मोहरी ची फोडणी करून त् त्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात.
  • नंतर त्यात कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालून चांगले परतावे.
  • भिजवलेली डाळ व करटुल्याच्या फोडी घालून चांगल्या परताव्यात.
  • झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.  
  • नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी.
  • नंतर वरून ओले खोबरे व थोडी साखर घालावी.
  • ही भाजी गोडा मसाला घालूनही रुचकर व चांगली लागते.
  • गरमागरम करटोलीची  भाजी तयार आहे.
करटोली ची भाजी
करटोली ची भाजी

मोमॉर्डिका डायोइका (करटोली) ही कुकुर्बिटेसी कुलातील वनस्पती आहे, जी आशियातील एक मूलस्थानिक वेल आहे. भारत आणि बांगलादेशात ती मोठ्या प्रमाणावर आढळते. कंटोळा ही वनस्पती विविध रोगांच्या प्रतिबंधक आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ही वनस्पती पोषणमूल्यांनी समृद्ध असून, हजारो वर्षांपासून भाजीपाला म्हणून वापरली जात आहे. कंटोळा वनस्पतीमध्ये अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, स्टेरॉइड्स, ट्रायटरपेनॉइड्स, फ्लेवोनॉइड्स, उर्सोलिक असिड, जीवनसत्त्वे, खनिजे आणि भरपूर प्रमाणात तंतू असतात, जे दमा, सूज, ताप, मानसिक आणि पाचनासंबंधी विकार यांसारख्या आजारांवर गुणकारी असतात. त्वचेच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठीही ही वनस्पती उपयोगी आहे.

करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे.  करटोलीचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक आहे. वात, कुष्ठरोग, मूत्रस्राव, प्रमेह व मधुमेहात करटोलीची फळे उपयुक्त आहेत. अति लाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास यातही करटोली गुणकारी आहे. रक्तरोग, डोळ्यांचे रोग, या विकारांत करटोलीचा वापर करतात. कच्चे फळ भाजी म्हणून वापरतात. हे तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात.

author

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Similar Posts

Leave a Reply