मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर हजारो-लाखो काजवे लुकलुकताना दिसतात आणि जणू सगळा जंगल परिसरच दिव्यांनी सजलेला वाटतो. हे दृश्य पाहणं म्हणजे जणू निसर्गाची जादू अनुभवणं आहे.
काजवा म्हणजे काय
काजवा (Firefly) हा प्रकाश उत्सर्जन करणारा किडा आहे. कोलिऑप्टेरा (Coleoptera) गणाच्या भुंग्याच्या, लॅपिरिडी (Lampyridae) कुलात याचा समावेश होतो. काजव्याला निशाचर भुंगा सुद्धा म्हणता येईल. काजव्याच्या जवळपास २,००० जाती असून अंटार्क्टिका खंड वगळता हा कीटक सर्व खंडांवर आढळतो.
काजवे कसे दिसतात आणि वागतात
काजवे लांबट, मऊ शरीराचे असतात. ते रंगाने पिवळसर, तांबूस किंवा मंद काळसर दिसतात. नर काजव्यांना पंख असतात, आणि त्यांचे डोळे चांगले विकसित झालेले असतात. माद्या मात्र अळीसारख्या दिसतात, त्यांना पंख नसतात आणि कमी हालचाल करतात. दिवसा हे कीटक झाडांवर, पानाखाली लपून बसतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात.

काजव्यांची अन्न साखळी
प्रौढ काजवे फारसं अन्न घेत नाहीत. त्यांच्या अळ्या मात्र गोगलगाय आणि मृदुकाय प्राण्यांवर जगतात. त्यांना पक्षी, सरडे, बेडूक, कोळी हे खाऊ शकतात.
काजवे का आणि कसे चमकतात
काजव्यांच्या पोटात एक नैसर्गिक प्रकाशनिर्मितीची प्रक्रिया घडते, जी ‘बायोल्युमिनसन्स’ (Bioluminescence) म्हणून ओळखली जाते. यामध्ये लुसिफेरीन (luciferin), लुसिफेरेस (luciferase), मॅग्नेशियम (magnesium) आणि प्राणवायू (oxygen) यांच्या संयोगाने रासायनिक प्रतिक्रिया होते, आणि त्यातून प्रकाश तयार होतो. हा प्रकाश पांढरा, पिवळा, हिरवट, निळसर किंवा नारिंगी रंगाचा असू शकतो. प्रत्येक जातीच्या काजव्यांची प्रकाश देण्याची वेळ, पद्धत आणि रंग वेगळा असतो.
काजव्यांचे जीवनचक्र
प्रजनन हंगामात नर काजवा चमकून मादीला आकर्षित करतो. मादी प्रतिसाद देताच मीलन होतं. नंतर मादी दमट जागी अंडी घालते. काही आठवड्यांत अळ्या बाहेर पडतात, अळी कोशात जाते आणि शेवटी प्रौढ काजवा तयार होतो. एकूण आयुष्य फार मोठं नसतं – प्रौढ अवस्थेत ५ ते ३० दिवस.
काजव्यांचं पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व
काजवे जैविक कचरा विघटनात मदत करतात, काही प्रकारांमध्ये परागीभवनातही त्यांचा उपयोग होतो. आदिवासी समुदायांमध्ये त्यांना निसर्गाच्या शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं.
काजवे का कमी होत आहेत
काजवे विशिष्ट झाडांवरच राहतात – हिरडा, बेहडा, आंबा, उंबर अशा झाडांवर. पण अति वृक्षतोड, रस्ते बांधकाम, आणि मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास कमी झाले आहेत.
काजवा महोत्सव म्हणजे काय
मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून जूनच्या शेवटपर्यंत काजवा महोत्सव साजरा केला जातो. यावेळी नर काजवे माद्यांना आकर्षित करण्यासाठी लुकलुकतात आणि संपूर्ण जंगल प्रकाशमान होतो. अनेक पर्यटन संस्था आणि निसर्गप्रेमी यासाठी खास मोहीमा आणि ट्रिप्स आयोजित करतात.
महाराष्ट्रात काजवा महोत्सव कुठे पाहता येतो
काजव्यांचा जादूई प्रकाश अनुभवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काजवा महोत्सव साजरे केले जातात. यामध्ये भंडारदरा परिसर सर्वात प्रसिद्ध मानला जातो, कारण येथे मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजारो काजवे लुकलुकताना दिसतात.
प्रमुख ठिकाणं
काजवा महोत्सवासाठी खालील भाग विशेष प्रसिद्ध आहेत:
- भंडारदरा: इथं ‘रंधा धबधबा’, ‘पांजरे’, ‘कोलटेंभे’, ‘उडदावणे’ यांसारखी आदिवासी गावं आणि जंगल भागात हजारो काजवे पाहायला मिळतात.
- ताम्हिणी-घाट, मुळशी आणि पौड परिसर: पुण्याजवळ हे ठिकाण लोकप्रिय होत आहे.
- भीमाशंकर आणि सिद्धगड वाडी: जंगलसंपन्न भाग असल्यामुळे निसर्ग आणि काजवे दोन्हींचा अनुभव घेता येतो.
- प्रबळमाची आणि कोथळीगड (पेठ किल्ला): साहस आणि निसर्गप्रेमींसाठी हे आकर्षणाचे ठिकाण.
- राजमाची (लोणावळा): जंगल आणि किल्ल्यांच्या सान्निध्यात काजवे पाहण्याचं उत्तम ठिकाण.
काजवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी काय करावं?
- ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंती गट: अनेक पर्यटक कंपन्या आणि स्थानिक ट्रेकिंग ग्रुप्स काजवा महोत्सवासाठी रात्रीच्या कॅम्पिंग सहली आयोजित करतात. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून ट्रिप्स उपलब्ध असतात.
- ऑनलाइन बुकिंग: ‘Fireflies Festival Maharashtra’, ‘Bhandardara Fireflies Camping’, ‘Rajmachi Fireflies Trek’ असे शोधल्यास अनेक बुकिंग पर्याय मिळतात. काही ट्रिप्समध्ये कॅम्पिंग, जेवण, मार्गदर्शक, ट्रेकिंग यांचा समावेश असतो.
- स्वतः जाण्याचा विचार करत असाल तर स्थानिक आदिवासी गावकऱ्यांची मदत घ्या. जंगलात नशिबाने काजवे सहज सापडत नाहीत, आणि योग्य वेळ व ठिकाण ठरवणं महत्त्वाचं असतं.
जाण्यापूर्वी लक्षात ठेवा:
- मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ते जूनच्या सुरुवातीपर्यंत काजवे दिसण्याचा सर्वोत्तम काळ आहे.
- पावसाळा सुरू झाल्यावर त्यांची संख्या कमी होते.
- रात्री ८ ते ९.३० या वेळेत ते अधिक लुकलुकतात.
जबाबदार पर्यटक कसे बनाल
काजवे बघायला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवा. वाहनांचे दिवे, बॅटरी लाइट, कॅमेरा फ्लॅश वापरू नका. झाडांखाली गोंधळ करू नका. झाडांच्या खूप जवळ जाऊन मादी काजव्यांच्या अधिवासाला धोका पोहोचवू नका. स्थानिक लोकांच्या आणि वनविभागाच्या सूचनांचं पालन करा. कचरा करू नका. निसर्ग सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी आहे.
शेवटी एकच सांगायचं – काजवा महोत्सव अनुभवायला विसरू नका, पण निसर्गाचा आदर करत.
तुम्हाला अशा गमतीशीर, विज्ञानावर आधारित निसर्गकथा आवडतात का? मग, आमच्या बाल विभागात अधिक कथा शोधा.