Free range poultry
Free range poultry, Image credit: Steven Van Elk, https://www.pexels.com/

देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

भारतामध्ये कोंबडी पालन करताना एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो — खरी देशी कोंबडी कोणती? आणि देशी अंडी म्हणजे नेमकं काय? अनेक वेळा बाजारात जे ‘देशी अंडी’ (desi/ country eggs) म्हणून विकले जातात, ती प्रत्यक्षात देशी-टाईप (improved/desi-type) जातींच्या कोंबड्यांची अंडी असतात. या लेखात आपण देशी व देशी टाईप कोंबड्यांमधील फरक, अंडी व मांसाचे पोषणमूल्य, NBAGR नोंदणीबाबत माहिती आणि बाजारातील फसवणुकीबाबत स्पष्टपणे जाणून घेणार आहोत.

देशी कोंबडी म्हणजे काय?

देशी कोंबड्या म्हणजे भारतात पारंपरिक पद्धतीने विकसित झालेल्या मूळ (native) जाती. यामध्ये Kadaknath (कडकनाथ), Aseel, Nicobari, Ghagus, Haringhata Black अशा काही प्रमुख जातींचा समावेश होतो. या जातींची नोंदणी NBAGR (National Bureau of Animal Genetic Resources) मार्फत केली जाते. NBAGR ही संस्था देशी प्रजातींची ओळख, नोंदणी व संरक्षण यासाठी कार्यरत आहे.

NBAGR नोंदणीकृत काही देशी कोंबडी जाती:

  • कडकनाथ (Kadaknath) – मध्यप्रदेश
  • असील (Aseel) – आंध्रप्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, इ.
  • निकोबारी (Nicobari) – अंदमान
  • घगस (Ghagus) – कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, इ.
  • हरींगहाटा ब्लॅक (Haringhata Black) – पश्चिम बंगाल

टीप: वरील जाती विविध राज्यांमध्ये स्थानिक नावांनी ओळखल्या जातात. अनेक पारंपरिक जाती विशिष्ट भौगोलिक क्षेत्राशी निगडीत असून त्यांचे अद्ययावत नोंद आणि माहिती NBAGR वेबसाइटवर उपलब्ध आहे.  NBAGR कडून अद्ययावत देशी जातींची यादी येथे पाहता येते – https://nbagr.icar.gov.in

देशी-टाईप कोंबडी म्हणजे काय?

देशी-टाईप कोंबड्या म्हणजे शासकीय संस्थांनी किंवा खासगी कंपन्यांनी विकसित केलेल्या ‘सुधारित / इम्प्रुव्हड जाती (Improved breeds)’. त्या देशी कोंबडीसारख्या दिसतात पण त्यांचे उत्पादन अधिक (जास्त अंडी/मांस) देण्यासाठी सुधारित केलेले असते.

देशी टाईप कोंबडी जातींचे काही उदाहरणे:

  • वनराजा (Vanaraja)
  • ग्रामप्रिया (Gramapriya)
  • कुरीलर (Kuroiler)
  • स्वर्णधारा (Swarnadhara)

हे पक्षी शासकीय योजनांतून शेतकऱ्यांना वाटले जातात आणि अनेक वेळा त्यांचे अंडी ‘देशी’ म्हणून बाजारात विकले जाते.

अंड्याची तुलना: देशी vs देशी-टाईप

घटकदेशी अंडीदेशी टाईप अंडी
रंगगडद तपकिरी/केसरीथोडक्याचसा तपकिरी
चवअधिक स्वादिष्टतुलनेत सौम्य
पोषणअधिक कॅरोटिनॉईड्स, ओमेगा 3थोडेसे कमी
किंमतRs. 15–Rs. 25 प्रति अंडंRs. 10–Rs. 15 प्रति अंडं

मांसाची गुणवत्ता: देशी vs देशी टाईप

घटकदेशी कोंबडीचे मांसदेशी टाईप कोंबडीचे मांस
चवअधिक भरदार, पारंपरिकसौम्य चव
पोषणप्रोटीन भरपूर, चरबी कमीचरबी तुलनेने थोडी जास्त
किंमतRs. 600–Rs. 800/kg (कोंबड्याला अधिक किंमत)Rs.250–Rs. 400/kg

देशी अंडी आणि मांस खरोखरच अधिक पोषक असतात का?

होय, पण संपूर्ण चित्र समजून घेणे महत्त्वाचे आहे.

  • देशी अंड्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडस्, कॅरोटिनॉईड्स, आणि विटॅमिन A अधिक प्रमाणात असतात, विशेषतः जर त्या कोंबड्या मुक्तसंचारात आणि नैसर्गिक आहारावर वाढल्या असतील.
  • देशी कोंबडीचे मांस तुलनेत अधिक चविष्ट आणि प्रोटीनयुक्त असते.
  • मात्र, सर्वच ‘देशी’ म्हणून विकले जाणारे अंडे/मांस खरेच देशी कोंबडीचे आहे की नाही, याबाबत ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे.

टीप: फक्त अंड्याचा रंग पाहून त्याचे पोषण ठरवता येत नाही. उत्पादनपद्धती, खाद्य आणि पक्ष्याचा प्रकार महत्त्वाचा असतो.

देशी अंड्याच्या नावाखाली फसवणूक

आज बाजारात ‘देशी अंडी’ या नावाखाली मोठ्या प्रमाणावर देशी टाईप कोंबड्यांची अंडी विकली जातात. त्यामुळे:

  • ग्राहक गोंधळात पडतो आणि अधिक किंमत देतो.
  • देशी अंड्याचा ‘ब्रँड’ तयार होतो, पण खरी पारंपरिक जात मागे पडते.

उपाय:

  • थेट स्थानिक शेतकऱ्यांकडून अंडी/कोंबडी खरेदी करा.
  • शक्य असल्यास NBAGR नोंदणीकृत जातींची माहिती मागा.
  • उत्पादनपद्धती जाणून घ्या – मुक्तसंचार, स्थानिक खाद्य इ.

‘देशी अंडी’ किंवा ‘देशी कोंबडी’ ही फक्त एक मार्केटिंग टर्म नसून ती एका विशिष्ट जैविक ओळखीशी निगडीत आहे.  ग्राहकांनी खरी देशी कोंबडी कोणती, आणि देशी/ देशी टाईप यातील फरक समजून घेऊन  सजग खरेदी  करावी. NBAGR नोंदणीकृत देशी जातींच्या संवर्धनासाठी शेतकरी आणि ग्राहक दोघांनीही पुढाकार घ्यावा.

author

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

Similar Posts

Leave a Reply