लडाखचं नाव ऐकलं की आपल्याला आठवतात बर्फाच्छादित पर्वत, निळसर आकाश आणि हिमनद्यांचे भव्य दृश्य. अनेकांना वाटतं की इतकं थंड प्रदेश म्हणजे पाण्याची काही कमतरता नसावी. पण प्रत्यक्षात लडाख हे “थंड वाळवंट (Cold Desert)” आहे. येथे हवामान अत्यंत कोरडे असून, वार्षिक पर्जन्यमान १०० मिमी पेक्षा कमी आहे (IJSART, 2020).
थंडी एवढी की हिवाळ्यात -२० अंशांपर्यंत तापमान घसरतं, पण उन्हाळ्यात ते ३० अंशांवर पोहोचतं. एवढ्या टोकाच्या हवामानामुळे हिमनद्या हेच एकमेव जलस्रोत आहेत. मात्र हवामान बदलामुळे त्या वेगाने वितळतात आणि पाणी चुकीच्या वेळेला उपलब्ध होतं. एप्रिल-मे महिन्यात पिकांना सिंचनाची गरज असताना झरे कोरडे पडतात. अशा गंभीर परिस्थितीत एक कल्पक उपाय पुढे आला – आइस स्तुपा (Ice Stupa). हा बर्फाचा मनोरा म्हणजे हिवाळ्यात वाया जाणारं पाणी उन्हाळ्यासाठी साठवण्याचा हुशार मार्ग.
आइस स्तुपा म्हणजे काय?
आइस स्तुपा म्हणजे हिवाळ्यात तयार केलेला बर्फाचा कृत्रिम शंकू, जो उन्हाळ्यापर्यंत टिकतो आणि पाणी पुरवतो. त्याची रचना एखाद्या मोठ्या “वॉटर टॉवर”सारखी असूनही ऊर्जा खर्च न करता तो उभारला जातो.
हिवाळ्यात नदी वा झऱ्याचं पाणी पाइपने उंचावर नेलं जातं. गुरुत्वाकर्षणामुळे पाणी हवेत फवारलं जातं. थंड वातावरणात थेंब गोठतात आणि बर्फाचा थर साठत जातो. काही महिन्यांत हा थर वाढून ३०–५० मीटर उंचीचा मनोरा तयार होतो. अशा स्तुपामध्ये १.५–३ कोटी लिटर पाणी साठवता येतं (Tribal Ministry Report, 2016).
या मनोऱ्याचा आकार बौद्ध स्तूपा (Buddhist Stupa) सारखा दिसतो, आणि लडाखमधील लोकांच्या सांस्कृतिक परंपरेशी तो जुळतो. म्हणूनच त्याला “आइस स्तुपा (Ice Stupa)” असं नाव दिलं गेलं. या नावात विज्ञान आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. बर्फाचा शंकू सूर्यप्रकाशाला कमी क्षेत्र देतो, त्यामुळे बर्फ जास्त काळ टिकतो. यामुळे हा उपाय फक्त तांत्रिकच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही गावकऱ्यांना जवळचा वाटतो.
सिंचनासाठी महत्त्व: वेळेवर पाणी = वेळेवर शेती
लडाखमध्ये शेती हंगामी आहे आणि हंगाम लहान असतो. पेरणी वेळेवर झाली नाही तर शेतकऱ्यांचं पूर्ण वर्ष धोक्यात जातं. डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ इतका थंड असतो की पाणी शेतीसाठी वापरण्याचा हंगामच नसतो. जमिन गोठलेली असते, बियाणं पेरणं अशक्य असतं. या काळात झऱ्यांमधून वाहणारं पाणी थेट नदीत मिसळतं आणि वाया जातं.
आइस स्तुपा मात्र हेच पाणी हिवाळ्यात गोठवून ठेवतो आणि एप्रिल–मे महिन्यात वितळतो. हा तोच काळ जेव्हा शेतकऱ्यांना सर्वाधिक सिंचनाची गरज असते. त्यामुळे शेतकरी निर्धास्तपणे पेरणी करू शकतात. गहू, जौ, मटार, भाज्या — या पिकांच्या सुरुवातीच्या वाढीसाठी हे पाणी अमृतासारखं ठरतं.
पूर्वी हिवाळ्यात वाहून जाणारं पाणी आता उपयोगी ठरू लागलं आहे. यामुळे उत्पादनात स्थिरता आली आहे.
शाश्वत शेतीशी नातं
आइस स्तुपा हा फक्त पाणी साठवण्याचा मार्ग नाही, तर क्लायमेट-स्मार्ट शेतीचं (Climate Smart Agriculture) आदर्श उदाहरण आहे.
- ऊर्जाविरहित: यात पंप नाहीत, वीज नाही, डिझेल नाही. फक्त गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने काम होतं.
- कमी खर्चिक: पाइप आणि साधी फवारा यंत्रणा पुरेशी असते. मोठ्या गुंतवणुकीची गरज नसते.
- पर्यावरणपूरक: कार्बन उत्सर्जन होत नाही. स्थानिक साधनसामग्रीतून उभारणी केली जाते.
- विस्तारक्षम: हिमाचल, सिक्कीम, नेपाळ आणि अगदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांमध्येही याचा प्रयोग केला जात आहे (CEEW, 2021).
ही संकल्पना दाखवते की स्थानिक ज्ञान आणि थोडं विज्ञान यांचा योग्य संगम करून हवामान बदलासारख्या आव्हानांवर उत्तर शोधता येतं. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पाण्याचं महत्व किती आहे हेही यातून स्पष्ट होतं.
गावकऱ्यांचा फायदा आणि नवीन संधी
आइस स्तुपा शेतकऱ्यांना पाणी देतोच, पण त्यातून संपूर्ण समाजजीवनाला फायदा होतो.
- शेतीत टिकाव: वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांचं उत्पादन वाढतं आणि अन्नसुरक्षा मजबूत होते.
- रोजगार: स्तुपा उभारणी, पाइपलाइन टाकणं, देखभाल या सगळ्यात गावकऱ्यांचा थेट सहभाग असतो. तरुणांना गावातच काम मिळतं.
- पर्यटन: दरवर्षी होणारा Ice Stupa Festival आता लडाखचं महत्त्वाचं आकर्षण ठरला आहे. हजारो पर्यटक बर्फाच्या या अनोख्या शिल्पासाठी लडाखला येतात. होमस्टे, गाइडिंग, स्थानिक खाद्यपदार्थ यामुळे गावकऱ्यांना उत्पन्न मिळतं.
- जागरूकता: हवामान बदल हा किती गंभीर विषय आहे हे लोकांना प्रत्यक्ष अनुभवातून समजतं.
आव्हाने
अर्थातच, आइस स्तुप्याने सर्व समस्या सुटतात असं नाही. काही मोठी आव्हाने आजही कायम आहेत.
- तापमान वाढ: हवामान बदलामुळे बर्फ अपेक्षेपेक्षा लवकर वितळतो, त्यामुळे पाण्याचा साठा कमी काळ टिकतो.
- भौगोलिक मर्यादा: हे तंत्रज्ञान फक्त थंड, उंच डोंगराळ भागातच शक्य आहे. सपाट किंवा उष्ण भागांत हे राबवता येत नाही.
- देखभाल: पाइपलाइनची स्वच्छता, गळती दुरुस्ती, देखभाल यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात.
ही आव्हाने मान्य करूनच आइस स्तुप्याचा प्रसार आणि टिकाव साध्य करावा लागेल.
सोनम वांगचुक – प्रेरणा मागचा माणूस
आइस स्तुपा च्या मागे आहेत लडाखचे सुप्रसिद्ध अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि हवामान कार्यकर्ता सोनम वांगचुक (Sonam Wangchuk).
- त्यांनी SECMOL (Students’ Educational and Cultural Movement of Ladakh) या चळवळीतून शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात बदल घडवला.
- हवामान बदलाशी (Climate Change) लढण्यासाठी आइस स्तुपा ची कल्पना मांडली आणि प्रत्यक्षात उतरवली.
- त्यांचे नाव आज जगभरातील क्लायमेट-इनोव्हेटर्समध्ये (Climate Innovators) घेतलं जातं.
- रॅमन मैगसेसे (Ramon Magsaysay Award (2018), Rolex Award (2016), Terra Award (2016), Global Award for Sustainable Architecture (2017) यांसह अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आहे.
त्यांच्या कल्पकतेमुळे लडाखमधील शेतकऱ्यांना पाणी मिळालं, गावकऱ्यांना रोजगार मिळाला आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी एक शाश्वत मार्ग जगासमोर आला.
लडाखसारख्या थंड वाळवंटात पाणी म्हणजे जीवनरेखा. आइस स्तुपा ही केवळ बर्फाची रचना नाही, तर गावांना दिलेलं नवं आयुष्य आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर सिंचन मिळतं, अन्नसुरक्षा वाढते, गावकऱ्यांना रोजगार मिळतो आणि पर्यटनाच्या संधी निर्माण होतात.
हे तंत्रज्ञान विज्ञान, संस्कृती आणि समुदायाचा सुंदर संगम आहे. आइस स्तुपा (Ice Stupa) हे हवामान बदलाला स्थानिक पातळीवर दिलेलं शाश्वत, प्रेरणादायी उत्तर आहे.