“बेला” – नागपूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. आकाराने लहान, पण संस्कृतीने समृद्ध. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबांनी वसलेलं हे गाव, वेंणा नदीवर सुरू असलेल्या मोठ्या धरण प्रकल्पामुळे हळूहळू बदलत गेलं – शेतीप्रधान जीवनशैलीत आता व्यावसायिक हालचालींची छाया दिसायला लागली.
हीच रूपांतरणाची प्रक्रिया मी लहानपणी अनुभवली. आमचं वडिलोपार्जित साधंसं घर, त्याच्या मागे एक छोटीशी स्वयंपाकघरासोबत जोडलेली बाग, आणि गावाजवळच असलेली आमची शेतीची जमीन. आई-वडील दोघंही शिक्षक होते, त्यामुळे त्यांना फार वेळ मिळायचा नाही. त्यामुळे माझं बालपण मी माझे आजोबा, आजी, आत्या, काका यांच्यासोबतच घालवलं – मातीशी, रोपांशी आणि निसर्गाशी नातं जपणारं बालपण.
“बिजापोटी कीड” – एक वडिलांची शिकवण
लहानपणी आम्हाला फळं आणि भाज्यांमध्ये कीड दिसली, की आम्ही लगेच तक्रार करत असू. “हे बघ, यात कीड आहे, हे खराब आहे,” असं म्हणत आईकडे किंवा आजीकडे न्यायचो. पण माझे वडील- थोडे आळशी– पण प्रेमळ, आणि शांत स्वभावाचे– आम्हाला नेहमी म्हणायचे, “बिजापोटी कीड असते!”
या शब्दांत खूप मोठा अर्थ दडलेला होता – म्हणजेच, जेवढं पोषणमूल्य जास्त, तेवढी कीटकांची आकर्षणं अधिक. आणि सर्वांत महत्त्वाचं – ही फळं किंवा भाज्या नैसर्गिकरीत्या वाढलेली आहेत, त्यावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केलेला नाही. त्यामुळे त्यात कीड असणं ही चांगली गोष्ट मानली जायची.
त्यांना सर्व भाज्या – विशेषत: हंगामी आणि राणभाज्या आवडत होत्या.
शहरातलं शिक्षण आणि नव्याने उमजलेली मूल्यं
त्या वेळी हे फारसं कळलं नव्हतं. पण आज, जेव्हा मी पर्यावरणशास्त्रात M.Sc. पूर्ण करून, काही वर्षं नागपूर, पुणे आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये राहिले, तेव्हा माझ्या बालपणाचे हे अनुभव पुन्हा पुन्हा आठवायला लागले.
आज यामागील वैज्ञानिक कारण समजून घेताना हे लक्षात येतं की, फळं आणि भाज्यांमधील नैसर्गिक साखर, सुगंधी संयुगे (volatile compounds), आणि पोषणमूल्यांमुळे कीटक त्याकडे आकर्षित होतात. उदाहरणार्थ – Organic vs conventional plant-based foods: A review या संशोधनानुसार, जैविक पिकांमध्ये काही mineral आणि vitamins चा स्तर अधिक असू शकतो, त्यामुळे त्याच्या नैसर्गिक गुणवत्तेचं स्तर अधिक मानलं जातं
शहरांमध्ये भाजी खरेदी करताना “ऑर्गेनिक स्टिकर” (Organic Stickers / Labels) लावलेली उत्पादने पाहिल्यावर मी हसते – कारण आमचं संपूर्ण बालपण तेच होतं. आज या अनुभवांची किंमत समजते.
शहरात राहताना जीवन वेगळं होतं – काम, घर, आणि मुल सांभाळत असताना आपल्याला आपला मुळाशी असलेला दुवा कधी तुटतो हे कळतही नाही.
पुन्हा गावाकडे वळताना – सेंद्रिय शेतीचं नातं
गेल्या काही वर्षांपासून मी आणि माझे पती – आम्ही पुन्हा आमच्या गावाकडे वळायला सुरुवात केली आहे. थोड्या प्रमाणात का होईना, पण नैसर्गिक/ सेंद्रिय शेती (Natural /Organic Farming) आणि बागकाम (Gardening) या गोष्टी पुन्हा हातात घेतल्या आहेत. आणि या प्रक्रियेत मला माझ्या वडिलांची “बिजापोटी कीड” ही संकल्पना नव्याने उमजते आहे.
सेंद्रिय शेती म्हणजे केवळ ट्रेंड नव्हे, ती आपल्या आरोग्याशी, पर्यावरणाशी आणि मानसिक समाधानी जीवनशैलीशी जोडलेली आहे. शुद्ध अन्न खाणं हे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी अत्यावश्यक आहे.
पिढ्यानपिढ्या पोषणारा दृष्टिकोन
या सगळ्या प्रक्रियेला अर्थ प्राप्त होतो, जेव्हा आपण त्यामागचं बालपणीचं अनुभवविश्व आठवतो – जेव्हा आजीच्या हातचं ताजं तूप, अंगणातली ताजी मेथी आणि मागच्या कुंडीतली मिरचीची रोपं यांच्यात खरं समाधान दडलेलं असायचं.
आज मी माझ्या मुलाला हेच शिकवू पाहते आहे – की अन्न हे केवळ दुकानात मिळणारी वस्तू नाही, तर ते मातीपासून उगम पावणारं जीवनाचं मूळ आहे. आणि जर एखाद्या फळात किंवा भाजीत थोडीशी कीड दिसली, तर ती फेकून न देता, त्यामागचं पोषण आणि परिश्रम समजून घेणं हेच खरं शहाणपण आहे.
“बिजापोटी कीड” ही एक जीवनदृष्टी
माझ्या वडिलांनी दिलेली “बिजापोटी कीड” ही शिकवण – हे केवळ शेतीचं तत्त्वज्ञान नाही, तर एक मूल्य आहे – जे आरोग्य, पर्यावरण आणि जीवनशैली या सगळ्याशी संबंधित आहे.
आजही मी ही शिकवण जपते आहे, आणि पुढच्या पिढीकडे प्रेमाने हस्तांतरित करते आहे – फक्त एक आठवण म्हणून नव्हे, तर एक जिवंत जीवनशैली म्हणून.
जर तुम्हीही सेंद्रिय शेती किंवा बागकाम करत असाल, तर तुमचे अनुभव खाली कॉमेंटमध्ये जरूर शेअर करा.