भारतातील ग्रामीण समाज अजूनही अनेक मूलभूत आव्हानांशी झगडतो आहे – अपुरं शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि असुरक्षित उत्पन्न. सरकारी योजना व धोरणं मदत करतातच, पण त्यांचा परिणाम अनेकदा धीमा किंवा अपुरा ठरतो. अशा परिस्थितीत खाजगी परोपकारी उपक्रम महत्वाची भूमिका बजावतात.
अज़ीम प्रेमजी (Azim Premji), IT उद्योगातील यशस्वी उद्योजक आणि विप्रो (Wipro) चे संस्थापक, यांनी स्वतःच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजकल्याणासाठी दिला. आज ते भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या परोपकारींपैकी एक आहेत. त्यांचं ध्येय स्पष्ट आहे — न्याय्य, समताधिष्ठित आणि शाश्वत समाजाची निर्मिती.
फाउंडेशनची ओळख
अज़ीम प्रेमजी फाउंडेशन (Azim Premji Foundation) ची स्थापना 2001 मध्ये झाली. सुरुवातीला उद्दिष्ट होतं – ग्रामीण व सरकारी शाळांमध्ये शिक्षण सुधारणा घडवणं. पण आज या फाउंडेशनचं काम शिक्षणाबरोबरच (Education), आरोग्य (Health), उपजीविका (Livelihood), आणि अनुदाने (Grants) या चार महत्त्वाच्या स्तंभांभोवती विस्तारलं आहे. फाउंडेशन चं काम फक्त शहरापुरतं मर्यादित नसून ग्रामीण व आदिवासी पट्ट्यात पसरलेलं आहे, जेथे गरज सर्वात जास्त आहे.
₹3,10,000 कोटींचं दाननिधी (Endowment Fund) हे भारतातील सर्वात मोठं खाजगी परोपकारी देणगी (philanthropic endowment) मानलं जातं, ज्यामुळे फाउंडेशनचं काम दीर्घकालीन आणि शाश्वत पद्धतीने चालू राहू शकतं. या निधीतून फक्त वार्षिक व्याज व उत्पन्न (returns) शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि अनुदान यावर खर्च केला जातो. त्यामुळे दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा वापर ग्रामीण व वंचित समाजासाठी होतो, पण मूळ भांडवल कायम सुरक्षित राहतं. ही रचना अमेरिकेतील मोठ्या विद्यापीठांच्या endowment मॉडेलसारखी असली, तरी ग्रामीण भारतासाठी काम करणाऱ्या खाजगी फाउंडेशनकडून एवढ्या प्रमाणात दाननिधी असणं खरंच बेजोड आहे.
खालील तक्त्यात गेल्या काही वर्षांत फाउंडेशनने केलेल्या एकूण खर्चाचं चित्रण दिलं आहे, जे त्यांच्या कामाची व्याप्ती आणि सातत्य दाखवतं.

Source: Azim Premji Foundation Report – June 2025
ग्रामीण शिक्षण: बदलाची वाट
शिक्षण हे फाउंडेशनचं हृदय आहे. ग्रामीण शाळांमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देणं, अभ्यासक्रम सुधारणा करणं आणि मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणं या गोष्टींवर ते काम करतात.
- 59 जिल्हा केंद्रं आणि 291 शिक्षक शिक्षण केंद्रे (Teacher Learning Centres) च्या माध्यमातून, शिक्षकांना सतत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिलं जातं. हे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला स्थिरता देतं.
- प्रात्यक्षिक शाळा (Demonstration Schools) (9 शाळा) – इथे नव्या शैक्षणिक पद्धतींची चाचणी होते. या शाळा आदर्श नमुने ठरून इतर सरकारी शाळांमध्ये बदल घडवतात.
- अज़ीम प्रेमजी विद्यापीठ (Azim Premji University) (बंगळुरू, भोपाळ, रांची – रांचीचे काम सुरू आहे): येथे शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात अभ्यासक्रम आहेत.
- विद्यापीठातील 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती मिळते. त्यामुळे ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्याची दारे खुली होतात.
शिष्यवृत्ती उपक्रम (Scholarship for Girls)
ग्रामीण व वंचित मुलींना उच्च शिक्षण मिळावं यासाठी फाउंडेशनने विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
- रक्कम: दरवर्षी INR 30,000 (पूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीत).
- पात्रता:
- 10वी व 12वी शिक्षण नियमित पद्धतीने सरकारी शाळेत पूर्ण केलेलं असावं.
- 2025–26 शैक्षणिक वर्षात मान्यताप्राप्त पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला असावा.
- अभ्यासक्रमाची मुदत 2 ते 5 वर्षांदरम्यान.
- पायलट फेज (2024–25): मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि झारखंड – 25,000 मुलींना मदत.
- विस्तार: पुढील दोन वर्षांत हा कार्यक्रम संपूर्ण भारतात.
अर्ज कसा करावा?
- अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाइन आहे: https://azimpremjifoundation.org/what-we-do/education/azim-premji-scholarship/
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं: पासपोर्ट फोटो, सही, आधार कार्ड, बँक पासबुक/स्टेटमेंट, 10वी आणि 12वी मार्कशीट, कॉलेज प्रवेशाचा पुरावा.
- कोणतीही फी नाही – अर्ज पूर्णपणे मोफत आहे.
- शिष्यवृत्ती गट 2025 /Scholarship Cohort 2025 साठी नोंदणी सुरू आहे.
सूचना: कोणत्याही मध्यस्थाकडे किंवा एजंटकडे पैसे देऊ नका. फाउंडेशन कधीही शिष्यवृत्तीसाठी शुल्क आकारत नाही.
ग्रामीण आरोग्य व पोषण
2022 मध्ये फाउंडेशन ने आरोग्य क्षेत्रात प्रवेश केला. अल्पावधीत त्यांनी ग्रामीण व शहरी गरीब समाजाला लक्षात घेऊन मोठे कार्यक्रम सुरू केले.
- 814 क्रेचेस (बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा) – 12,000+ मुलांना पोषण, सुरक्षित वातावरण, आणि प्रारंभिक शिक्षण.
- बंगळुरु शहरी झोपडपट्टीतील 15,000 कुटुंबं – प्राथमिक आरोग्य सुविधा व जागरूकता मोहिमा.
- कर्नाटक मध्यान्ह भोजन उपक्रम / Karnataka Mid-Day Meal Initiative – 55 लाख मुलांना आठवड्यातून 4 दिवस अंडी पुरवण्याची योजना. हा ₹1,500 कोटींचा प्रकल्प 3 वर्षांसाठी आहे आणि ग्रामीण पोषण सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
- आदिवासी पट्ट्यातील आरोग्य प्रकल्प – प्राथमिक आरोग्य केंद्रांना मदत, महिलां व बालकांसाठी पोषण मोहिमा.
ग्रामीण भागात आरोग्याची दुर्लक्षिता गेल्या अनेक दशकांत मोठा प्रश्न राहिला आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशन च्या या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांना थेट लाभ मिळतो आहे.
ग्रामीण उपजीविका व शेतकरी मदत
शेतकरी व आदिवासींच्या उपजीविकेवर फाउंडेशन ने 2022 पासून लक्ष केंद्रित केलं.
- लघु व सीमांत शेतकऱ्यांना स्थानिक संसाधनांवर आधारित शेती व उत्पादनासाठी मदत.
- “बस्तर ते बाजार” /“Bastar se Bazaar Tak” – जंगलातील उत्पादनांना थेट बाजाराशी जोडणारा प्रकल्प. त्यामुळे जंगलावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना रोजगार आणि बाजारपेठेतील दर मिळतो.
- कौशल्य प्रशिक्षण, महिलांसाठी रोजगाराच्या संधी, आणि सामुदायिक रोजगार हमी या कार्यक्रमांद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना.
यामुळे शेतकरी व आदिवासींना केवळ उत्पन्न वाढ नाही तर बाजाराशी जोडणं, स्थिरता आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळते.
अनुदाने (Grants) आणि NGO सहकार्य
अज़ीम प्रेमजी फाउंडेशनचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच उपक्रम राबवतात आणि इतर गैर-सरकारी संस्थाना (Non-Governmental Organization – NGO ) देखील सक्षम करतात.
- 1320+ संस्थांना अनुदाने.
- FY 2024–25 मध्ये 605 अनुदान मंजूर झाले, ज्यासाठी ₹1,639 कोटी वितरित झाले आणि एकूण ₹3,664 कोटींची वचनबद्धता.
- अनुदानांचे लक्ष: बालहक्क, लिंग समानता/ लिंगन्याय, आरोग्य, पोषण, पाणी-वन-भूव्यवस्था, अपंगत्व, शासन व्यवस्थेचं बळकटीकरण.
यामुळे छोट्या ग्रामीण संस्था सक्षम होतात, ज्यांना स्थानिक समस्यांची खरी जाण असते.
ग्रामीण विकासावर परिणाम
अज़ीम प्रेमजी फाउंडेशनचं काम तीन मोठ्या क्षेत्रांवर आधारित आहे — शिक्षण, आरोग्य, उपजीविका. हे तीन स्तंभ ग्रामीण भारताच्या विकासासाठी परस्परपूरक आहेत.
- शिक्षणामुळे मुलांना ज्ञान, आत्मविश्वास आणि भविष्याच्या संधी.
- आरोग्यामुळे महिलां-मुलांचं जीवनमान सुधारतं, कुपोषणावर नियंत्रण मिळतं.
- उपजीविकेचे प्रकल्प शेतकरी व आदिवासींना उत्पन्नवाढ व बाजारात प्रवेश देतात.
यामुळे ग्रामीण समाज अधिक सक्षम (resilient), आत्मनिर्भर (self-reliant), आणि शाश्वत (sustainable) बनतो आहे.
अज़ीम प्रेमजी यांचा परोपकार हा केवळ दानधर्माचा प्रकार नाही. तो ग्रामीण भारत बदलण्यासाठीची दीर्घकालीन गुंतवणूक आहे. शिक्षण व आरोग्य यांमध्ये गुंतवणूक करून फाउंडेशन ग्रामीण समाजाला नव्या वाटा दाखवत आहे. भविष्यात अशा प्रयत्नांनी भारतातील असमानता कमी होऊन न्याय्य आणि शाश्वत समाजाची उभारणी होऊ शकते.