किड्स कॉर्नर

जागतिक बेडूक दिन – बेडकांचे अद्भुत जग

वाघ, सिंह हे मोठे प्राणी तर सर्वांच्या चांगल्या परिचयाचे आहेत. पण थोडा पाऊस पडून गेल्यावर नदीकिनारी, किंवा एखाद्या डबक्यातून येणारा डराव, डराव हा आवाज ऐकला कि आपसूकच आपला कुतूहल जाग होत… हो ना हा तर आपल्या परीचयातला पिटुकला प्राणी म्हणजेच आपले बेडूकराव! लहानपणी गोष्टींच्या किंवा शाळांच्या पुस्तकात बेडकांची गोष्ट किंवा कविता ज्याने वाचली नाही असा एखादाच असेल! तर असा हा आपला परिचयाचा आपल्या आजूबाजूला वावरणारा प्राणी – बेडूक! जागतिक बेडूक दिन जवळ येत आहे. चला तर मग जाणून घेऊया आपल्या छोट्या मित्रांबद्दल.

जागतिक बेडूक दिन

तुम्हाला माहिती आहे का वर्ष २००९ पासून जगभरातील धोक्यात आलेल्या बेडूक प्रजातींच्या दुर्दशेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी २० मार्च हा जागतिक बेडूक दिन म्हणून साजरा केला जातो. बेडकांसह सर्व उभयचर प्राणी हे जागतिक परिसंस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत, बेडूक हा अन्नसाखळीचा एक महत्वाचा घटक आहे. पर्यावरणीय आरोग्याचे सूचक आणि मानवी आरोग्यात योगदान देणारे आहेत. त्यापैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त प्राणी सध्या नामशेष होण्याच्या धोक्यात आहेत. उभयचर नामशेष होण्याच्या संकटाला तोंड देणे हे मानवतेच्या इतिहासातील सर्वात मोठे प्रजाती संवर्धन आव्हान आहे.

उभयचर म्हणजे काय?

बेडूक हा उभयचर प्राणी आहे. उभयचर म्हणजे असे प्राणी जे त्यांच्या जीवनचक्रातील काही काळ पाण्यामध्ये व उर्वरित काळ जमिनीवर व्यतित करतात. जगामध्ये उभयचर प्राण्यांच्या ८,५८८ प्रजाती आढळून येतात. भारतामध्ये उभयचरांच्या ४५४ प्रजाती आहेत यापैकी बेडकांच्या ४११ प्रजाती आहेत. महाराष्ट्रामध्ये उभयचरांच्या ४३ प्रजातींची नोंद झाली आहे. यापैकी बेडकांच्या ३७ प्रजाती आहेत.

उभयचरांची उत्क्रांती

कालांतराने उभयचर प्राण्यांची उत्क्रांती तीन वर्गात झाली एक म्हणजे बेडूक आणि मंडूक (Frogs and Toads), Salamanders व Newts आणि सापासारखे दिसणारे Caecilians. यापैकी मानवी संस्कृतीमध्ये बेडूक या प्राण्याबद्दल अधिक उत्सुकता दिसते. कारण, पावसाळ्यात त्यांचे येणारे आवाज आणि त्यांच्या रंगांमध्ये असणारी कलात्मक विविधता.

उभयचर निर्माण कसे झाले?

याच उत्तर असं कि श्वास घेण्यासाठी या प्राण्यांना आधी त्वचा आणि मग कल्ल्यांचा (Gills) वापर करावा लागला. वैज्ञानिक असा अंदाज लावतात की, साधारण 400 दशलक्ष वर्षांपूर्वी सागरात Lobe-Finned Fish वास्तव्य करत होते. या माशांच्या कल्ल्यांचे रुपांतर कालांतराने पायासारख्या दिसणार्‍या अवयवांमध्ये होऊ लागले.

या नवीन शरीररचनेमुळे हे मासे समुद्राच्या तळाशी रांगत आपले जीवन जगू लागले. पण याचवेळी आपली पृथ्वी अनंत भौगोलिक बदलांमधून आणि वातावरणामधून जात होती. या अचानक पण बराच काळ टिकणार्‍या बदलांमुळे पृथ्वीवरील पाण्याची पातळी कमी अधिक होऊ लागली. पाण्याची पातळी कमी झाल्यावर पाण्यात श्वास घेणार्‍या जीवांना आपले जीव गमवावे लागले.

या सर्व कालखंडात, ज्याला ‘डेवोनिअन कालखंड (Devonian Period)’ म्हणतात, त्यात बर्‍याच प्रजातींचा नाश झाला. त्यानंतरच्या जीवांमध्ये कमी पाणी आणि प्राणवायू असणार्‍या या नवीन परिसंस्थांमध्ये तग धरून ठेवण्यासाठी काही बदल झाले. यातील सर्वात महत्त्वाचा बदल होता, तो फुप्फुसांसारख्या असणार्‍या अवयवांची निर्मिती.

या ऐतिहासिक उत्क्रांतीमुळे हे जीव हवेतील प्राणवायू सहजतेने वापरू लागले आणि साधारण ३७० ते ३४५ दशलक्ष वर्षांपूर्वी पहिल्या उभयचर प्राण्याची निर्मिती झाली. ही उत्क्रांती आपल्याला अधिक महत्त्वाची म्हणावी लागेल. कारण, इथूनच पृथ्वीवरील भूभागावर नांदणार्‍या चतुष्पाद जैवविविधतेची सुरुवात झाली.

या काळात पृथ्वीवर झाडांच्या काही पूर्वजांची निर्मिती झाली होती. त्याचसोबत पाठीचा कणा नसणारे जीवसुद्धा पृथ्वीच्या भूभागावर उत्क्रांत होत होते. नव्याने उदयाला आलेल्या उभयचरांनी मग या परिसंस्थेचा ताबा घेतला आणि तत्कालीन अन्नसाखळीमध्ये वरचे स्थान मिळवले.

या उत्क्रांतीमध्ये त्यांना काही किंमतसुद्धा मोजावी लागली. ती ही की, प्रजननासाठी आणि आपली कवच नसलेली अंडी घालण्यासाठी त्यांना पुन्हा पाण्याचा आधार घ्यावा लागत होता. आपण पाहिले तर आजसुद्धा बहुतांश उभयचर आपली अंडी पाण्यामध्येच घालतात! मग आहे कि नाही हा बेडूक महत्वाचा आणि जुना प्राणी!

बेडकांच्या प्रजाती

बेडूक हा लहान शरीराच्या, शेपटी नसलेल्या उभयचरांच्या विविध आणि मोठ्या प्रमाणात मांसाहारी गटाचा सदस्य आहे (प्राचीन ग्रीक avoupa पासून आला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ ‘शेपटीशिवाय’ आहे). प्रौढ बेडकाचे शरीर मजबूत असते, डोळे बाहेर, जीभ समोरून जोडलेली असते, हातपाय खाली दुमडलेले असतात आणि शेपूट नसते.

बेडकांची ग्रंथीयुक्त त्वचा असते, ज्यातून ते विविध प्रकारचे स्त्राव स्त्रवतात. भक्षकांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या त्वचेचा रंग चमकदार लाल, पिवळा आणि काळा असतो. प्रौढ बेडूक गोड्या पाण्यात आणि कोरड्या जमिनीवर राहतात; काही प्रजाती जमिनीखाली किंवा झाडांमध्ये राहण्यासाठी अनुकूल असतात.

बेडकांची जीवनपद्धती

प्रौढ बेडकांचा आहार सामान्यतः मांसाहारी असतो, परंतु काही प्रकारचे बेडूक वनस्पती पदार्थ देखील खातात. बेडूक भक्षकांसाठी एक महत्त्वाचा अन्न स्रोत आहेत आणि जगातील अनेक परिसंस्थांच्या अन्न जाळ्याचा भाग आहेत.

बेडकांची त्वचा पातळ असते, ज्यामुळे त्यांना निर्जलीकरण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते एकतर ओलसर ठिकाणी राहतात किंवा कोरड्या अधिवासांना तोंड देण्यासाठी विशेष अनुकूलन करतात.

बेडकांची प्रजनन प्रक्रिया

बेडूक त्यांच्या प्रजनन हंगामात, जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे आवाज काढतात. आवाजाने आकर्षित झालेल्या मादी पाण्यात अंडी घालते आणि नर त्याच वेळी अंड्यांवर शुक्राणूंचे बाह्य फलन करतो.

बेडूक सामान्यतः पाण्यात अंडी घालतात. अंडी उबवून ते टॅडपोल” नावाच्या जलचर अळ्यांमध्ये जन्माला येतात. त्यानंतर ते प्रौढांमध्ये रूपांतरित होतात तेव्हा त्यांचे जीवनचक्र पूर्ण होते. काही प्रजाती जमिनीवर अंडी ठेवतात.

पाण्यामध्ये अंडी घालणार्‍या बेडकांची अंडी ही आकाराने लहान व संख्येने जास्त असतात. भारतामध्ये आणि जगाच्या इतर भागांमध्ये पाण्याबाहेर अंडी घालणार्‍या बेडकांच्या प्रजातीसुद्धा पाहायला मिळतात. बेडकांची अंडी कवचरहित असल्यामुळे त्यांच्या वाढीसाठी हवामानात अधिक आर्द्रतेची गरज असते. त्यामुळे, पाण्याबाहेर अंडी घालणारे बेडूक हे जास्त पाऊस पडणार्‍या व दमट हवामान असणार्‍या प्रदेशात जास्त दिसून येतात.

भारतामध्ये सह्याद्रीच्या रांगेत व ईशान्य भागात अशा बेडकांची विविधता पाहायला मिळते.

1 / 6

बेडकांबद्दल काही मजेदार गोष्टी

  • बेडकांचे गट: बेडकांच्या गटाला ‘सेना’ (Army) असे संबोधले जाते.
  • त्वचेद्वारे पाणी शोषण्याची क्षमता: बहुतेक बेडूक त्यांच्या त्वचेद्वारे पाणी शोषू शकतात, त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने पाणी प्यावे लागत नाही.
  • उष्ण व थंड हवामानातील अनुकूलन: बेडूक अत्यंत अनुकूलनीय प्राणी आहेत. ते वाळवंट, किनारपट्टी, उष्णकटिबंधीय वर्षावन, उंच डोंगर आणि अनेक ठिकाणी आढळतात. मात्र अंटार्क्टिका वगळता ते जगभर पसरलेले आहेत.
  • भक्षकांसाठी वेगवान शिकारी: बेडूक त्यांच्या तोंडात बसणारी कोणतीही सजीव वस्तू खातात, ज्यामध्ये किडे, कोळी, स्लग, अळ्या आणि लहान मासे यांचा समावेश असतो. बेडकाची जीभ अवघ्या १५/१०० व्या सेकंदात भक्ष्य तोंडात ओढते.
  • हिवाळ्यातील अद्भुत प्रक्रिया: कठोर हिवाळ्यात काही बेडूक गोठतात आणि वसंत ऋतूमध्ये पुन्हा जिवंत होतात. या प्रक्रियेला हायबरनेशन म्हणतात.
  • विषारी बेडूक: काही चमकदार रंगाचे बेडूक खूप विषारी असतात आणि मानवांसाठी घातक ठरू शकतात. भारतात मात्र विषारी बेडूक आढळत नाहीत. अमेझॉनच्या जंगलात अशा विषारी बेडकांच्या काही प्रजाती सापडतात.
  • रंग बदलण्याची क्षमता: काही बेडूक प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि सभोवतालच्या परिस्थितीनुसार रंग बदलू शकतात किंवा छद्मवेश करू शकतात.
  • उत्क्रांतीतून विकसित कौशल्ये: उत्क्रांतीमुळे बेडकांना अन्न स्पर्धेत मात करण्यासाठी सूक्ष्म आणि स्थूल पातळीवर विविधता आणण्याची क्षमता मिळाली आहे. काही बेडकांच्या उत्क्रांतीचा अभ्यास केल्यास जुरासिक काळापासून त्यांचे सहअस्तित्व दिसून येते.
  • भारतातील सर्वात मोठा बेडूक: इंडियन बुल फ्रॉग हा भारतातील सर्वात मोठा बेडूक असून तो १७ सेमी लांब आणि ३ किलोपर्यंत वजनाचा असतो.
  • जगातील सर्वात मोठा बेडूक: जगात गोलियाथ बेडूक सर्वात मोठा असून त्याची लांबी ३२ सेमी असते.
  • सर्वात लहान बेडूक: सोनेरी बेडूक सर्वात लहान असून त्याची लांबी फक्त ०.३९ इंच असते.

बेडकांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो?

  • अनेक मानवी क्रियाकलापांमुळे अधिवास नष्ट होतो आणि उभयचर प्राण्यांचा नाश होतो, ज्यामध्ये जल प्रदूषण, स्थानिक नसलेल्या प्रजातींचा परिचय, हवामान बदल, शेती आणि शहरी विकास यांचा समावेश होतो.
  • ऊभयचरांना वाचवण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या पर्यावरणाचे रक्षण करणे महत्वाचे आहे.
  • किटकनाशकांचा वापर न करता घरी सेंद्रिय शेती पद्धती वापरूया.
  • पाणी वाचवा, बेडूक वाचवा— बॉटल पाण्याऐवजी नळाचे पाणी निवडल्याने बेडकांना आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण पाणी या संसाधनांची बचत होईल.

चला तर मग या पिटुकल्या उभयचर दोस्तासाठी एकत्र होऊयात,आणि जागतिक बेडूक दिन साजरा करूया!

Image credit:

https://commons.wikimedia.org/wiki/File:Indian_Bull_Frog_%28Hoplobatrachus_tigerinus%29_%2835530112680%29.jpg

https://commons.wikimedia.org/wiki/File:Indian_Burrowing_Frog_Sphaerotheca_breviceps_Juvenile_DSCN0998_%285%29.jpg

https://commons.wikimedia.org/wiki/File:Sahyadri_Marbled_Balloon_Frog_Uperodon_mormorata_by_Dr._Raju_Kasambe_DSCN5509_%283%29.jpg

https://commons.wikimedia.org/wiki/File:Common_Indian_Tree_Frog_%28Polypedates_maculatus%29._%2831588914002%29.jpg

https://commons.wikimedia.org/wiki/File:Golden_Poison_Frog_PK.jpg

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Recent Posts

घरीच करा तपासणी: कलिंगडात भेसळ ओळखण्याचे घरगुती उपाय

उन्हाळा आला की सगळी जनता थेट "कलिंगड मोड" मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी… Read More

1 day ago

ग्रामीण भागातून आलेले भारतीय क्रिकेटपटू: संघर्ष, श्रम आणि शौर्याची कहाणी

भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी… Read More

2 days ago

टोल नाक्याविना प्रवास: जीपीएस-आधारित टोल प्रणाली येतेय!

पूर्वी प्रवास करताना टोल नाक्यावर रोख पैसे देऊन रांगेत थांबणं ही एक सवयच होती. २०१४ नंतर FASTag प्रणाली आली आणि… Read More

2 days ago

This website uses cookies.