किड्स कॉर्नर

स्वर्गाचे झाड: बकानीचे झाडाचे अद्भुत रहस्य

धरती, आकाश, पाताळ, स्वर्ग ह्या सगळ्या कल्पना आपल्याला माहिती आहेत, पण या पृथ्वीवर असणाऱ्या एका झाडाला स्वर्गाचे झाड म्हणून ओळखले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित तुम्ही सर्वांनी हे झाड पहिले देखील असेल. अगदी आपल्या परिचयाचे, आपल्या परिसरात आढळणारे, कधीतरी ह्या झाडाला कडुलिंबाचेच झाड आहे असे समजून गोंधळात टाकणारे, उंचच उंच असा हा महावृक्ष!

यालाच महारुख, महानिंब, कवड्यानिंब किंवा बकानीचे झाड असे मराठीत म्हणतात.

याच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचीकडे बघून याला स्वर्गाचे झाड (Heaven Tree) असे देखील म्हटले जाते. या झाडाचे शास्त्रीय नाव एलिअँथस एक्सेल्सा (Ailanthus excelsa) आहे.

  • एलिअँथस म्हणजे स्वर्गीय झाड आणि
  • एक्सेल्सा म्हणजे उंच वाढणारे

आहे की नाही गंमतीदार!

पानझडी प्रकारातील हा वृक्ष भारत आणि श्रीलंकेत आढळतो.

इतिहास आणि वैज्ञानिक माहिती

धन्वंतरि-निघंटु आणि राजनिघंटु यासारख्या जुन्या संस्कृत वैद्यक ग्रंथांतदेखील या भव्य, सुंदर आणि पानझडी वृक्षाचा उल्लेख आहे.

  • या झाडाचे शास्त्रीय वर्णन प्रथम विल्यम रॉक्सबर्घ यांनी १७९५ मध्ये केले.
  • या प्रजातीत सुमारे ८ जाती असून त्यांपैकी भारतामध्ये ४ जाती आढळतात.
  • बिहार, छोटा नागपूर, मध्य प्रदेश, गुजरात आणि विशाखापट्टणम व दख्खन वगैरे भागांतील दाट जंगलात हा वृक्ष सापडतो.

झाडाची वैशिष्ट्ये

जलद वाढ आणि दीर्घायुष्य:

  • हा वृक्ष लवकर वाढणारा आणि खूप वर्ष जगणारा आहे. तो २५ मीटरपर्यंत उंच आणि ३ मीटरपर्यंत घेर वाढतो.

खास रचना आणि खुणा:

  • झाडाची साल फिकट करडी-भुरी व खरबरीत असते.
  • पाने कडुलिंबाच्या पानांसारखीच पण आकाराने मोठी असतात.
  • या झाडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जसजसे वय वाढते, तसतसे खालच्या फांद्या झडतात आणि झडून गेलेल्या फांद्यांच्या खुणा डागांच्या/ठिपक्यांच्या स्वरूपात याच्या बुंध्यावर दिसतात.

फुलांचा आणि फळांचा कालावधी:

  • बकानीचे झाडाला फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये पिवळट, लहान फुले येतात.
  • फळे विषारी असून उन्हाळ्याच्या शेवटी फळे तयार होतात.
  • फळांचा उग्र वास असल्यामुळे पक्षी ही फळे खात नाहीत.

औषधी आणि व्यावसायिक उपयोग

आयुर्वेदिक गुणधर्म:

  • या झाडाची साल जंतुनाशक आहे.
  • पानांचा रस आणि ताजी साल वेदनांवर उपाय म्हणून वापरली जाते.

लाकडाचा उपयोग:

  • फाटे, टेबल, खुर्च्या, कपाटे, दरवाजे-खिडक्या तयार करण्यासाठी या झाडाच्या लाकडाचा उपयोग होतो.
  • लहान फांद्या जाळण्यासाठी वापरतात.
  • याच्या लाकडाचा उपयोग खोकी, आगकाड्या, ढोल, तराफे, मासे पकडण्याच्या जाळ्यांचे तरंड (तरंगण्यासाठीचे तुकडे), नावा, तलवारीच्या मुठी, खेळणी यासाठी होतो.

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी उपयुक्त:

  • वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण (Suspended Particulate Matter – SPM) मोजण्यासाठी या झाडाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
  • वायू प्रदूषण मोजण्याच्या सर्वोत्तम झाडांपैकी हे एक मानले जाते.

हिरवळीचे खत आणि शेतीत उपयोग:

  • हिरवळीचे खत बनवण्यासाठीही या झाडाच्या पानांचा उपयोग होतो.

झाडाची घर आणि शेतीत लागवड करण्याचे फायदे:

  • हे झाड दिसायला सुंदर आणि सावली देणारे असल्यामुळे घरासमोर किंवा शेताच्या बांधावर त्याची लागवड अनेकजण करतात.
  • हवामानासाठी पोषक आणि शेतासाठी उपयुक्त असल्यामुळे शेतकऱ्यांसाठीही हे झाड फायदेशीर ठरते.

बकानीचे झाड – एक अनमोल देणगी

बालमित्रांनो, आता तुम्हाला स्वर्गाचे झाड म्हणजेच बकानीचे झाड, महारुख आणि महानिंब याबद्दल माहिती मिळालीच आहे ना?

या झाडाचे आरोग्यदायी गुणधर्म, व्यावसायिक फायदे आणि पर्यावरणासाठी उपयुक्तता लक्षात घेता हे झाड खरोखरच स्वर्गीय देणगी आहे!

तुमच्या परिसरात हे झाड दिसले की, त्याच्या उंच वाढीचे, औषधीय गुणधर्मांचे आणि पर्यावरणीय योगदानाचे कौतुक करायला विसरू नका!

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Recent Posts

चक दे! भारत: भारतीय महिला क्रिकेटचा सुवर्णअध्याय

२०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला — पहिल्यांदाच ICC महिला क्रिकेट विश्वचषक भारताच्या झोळीत आला! हा फक्त एक क्रीडा… Read More

फार्म स्टे व्यवसाय कसा सुरू करावा?

कल्पना करा, एखाद्या शनिवार-रविवारी शहरातील कुटुंब शेतावर येतं, सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने उठतं, दुपारी पिठलं-भाकरी खातं, आणि संध्याकाळी गावकऱ्यांसोबत शेकोटीजवळ बसून… Read More

नीम बायोपेस्टिसाइड – रासायनिक कीटकनाशकांना पर्यावरणपूरक पर्याय

भारतीय शेतकऱ्यांसाठी कडूलिंब म्हणजे फक्त झाड नाही — ते आपल्या शेतीचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे.  जवळजवळ प्रत्येक गावात, मंदिराजवळ किंवा… Read More