Agriculture

पर्माकल्चर: शेतकऱ्यांसाठी टिकाऊ शेतीचा मार्ग

आजचा शेतकरी मोठ्या संकटातून जातोय. रासायनिक खतं, कीटकनाशके, पाणी-वीज यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय; पण पिकांचे भाव मात्र जागच्या जागीच आहेत. मातीची सुपीकता घटतेय, पावसाचा अंदाज चुकतोय, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. या सगळ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे.

याशिवाय, रसायनांनी पिकवलेल्या अन्नामध्ये अवशेष राहतात. तो अन्नधान्य व भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. म्हणजेच ही समस्या केवळ शेतकऱ्यापुरती मर्यादित नसून ग्राहकांच्या आरोग्याशीही थेट जोडलेली आहे.

या पार्श्वभूमीवर पर्माकल्चर (Permaculture) ही पद्धत हळूहळू पुढे येते आहे. ही अशी शेती पद्धत आहे जी निसर्गाशी भांडण न करता, निसर्गासोबत चालते.

पर्माकल्चर म्हणजे काय?

पर्माकल्चरचा थोडक्यात अर्थ — निसर्ग जसा स्वतःला सांभाळतो, तसंच तत्त्वं शेतीत वापरणं.

जंगलात आपण खतं टाकत नाही, कीटकनाशकं फवारत नाही, तरी तिथं झाडं वाढतात, फळं लागतात, माती जिवंत राहते. पर्माकल्चर त्याच धड्याला शेतात आणते.

माती, पाणी, सूर्यप्रकाश, झाडं, प्राणी आणि माणूस — हे सगळे घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. या जोडणीला ओळखून शेती केली तर कमी खर्चात टिकाऊ उत्पन्न मिळू शकतं.

शेतकऱ्यांच्या अडचणी व वास्तव

पर्माकल्चर म्हणजे जादू नाही. यामध्येही काही अडचणी आहेत आणि त्या मान्य केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.

  • वेळ लागतो: एक सक्षम पर्माकल्चर शेत उभं रहायला २–४ वर्षे लागू शकतात.
  • शिकण्याची गरज: मल्चिंग, पिकांची मांडणी, पाणी अडवणं, जैवखते तयार करणं — हे थोडं वेगळं कौशल्य शिकावं लागतं.
  • ताबडतोब मोठा नफा मिळत नाही: सुरुवातीला छोटा फायदा जाणवतो (खर्च कमी होतो, माती सुधारते), पण मोठा बदल हळूहळू दिसतो.
  • सुरुवातीचा खर्च व मेहनत: कुंपण, कंपोस्ट खड्डे, पाणी अडवण्यासाठी चर — सुरुवातीला यासाठी थोडा वेळ आणि पैसा घालावा लागतो.
  • समाजिक व बाजारपेठेचे आव्हान: इतर शेतकरी “हे चालणार नाही” म्हणतील, आणि बाजारात थेट विक्रीचे मार्ग शोधावे लागतील.

पण या अडचणींना घाबरून थांबलो तर बदल होणारच नाही. महत्त्वाचं म्हणजे वास्तव स्वीकारून हळूहळू पुढे जाणं.

पर्माकल्चरमधील उपाय

  • माती व्यवस्थापन: मल्चिंग, पीक फेरपालट, बहुपीक रचना, हिरवे खत पिकं.
  • जैविक खते व कीटक व्यवस्थापन: कंपोस्ट, जिवामृत, नीम-आधारित द्रव्यं; सहचारी पिकं आणि उपयुक्त कीटकांचा वापर.
  • पाणी संवर्धन: स्वेल्स, चर, पावसाचे पाणी अडवणं, ड्रिप/मायक्रो सिंचन.
  • ग्रीन वॉटरचा वापर: कव्हर क्रॉप्स व मल्चिंगने मातीतील आर्द्रता टिकवणं.
  • फूड फॉरेस्ट/मिश्रपीक: झाडांचे थर (फळझाडे + डाळी + भाज्या) घेऊन उत्पादन विविध करणे.
  • शेती + पशुपालन: कोंबड्या, शेळ्या, गायी यांचा समावेश करून खत व अतिरिक्त उत्पन्न.
  • स्थानिक बियाणे: पारंपरिक वाणं जतन करून हवामानाशी सुसंगत शेती.

भारतातील काही उदाहरणे

Aranya Agricultural Alternatives (तेलंगणा व आंध्र प्रदेश): या संस्थेने हजारो शेतकऱ्यांना पर्माकल्चरचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या Permaculture Convergence शिबिरांतून पाण्याचं अडवणं, बहुपीक पद्धती आणि स्थानिक बियाण्यांचा वापर याबाबत प्रत्यक्ष शिकवणी मिळते. अनेक गावांत आता स्वेल्स आणि जलसंधारण रचना दिसतात.

Related Post

Aanandaa Permaculture Farm (हरियाणा): तब्बल २० वर्षांपासून चालणारा हा प्रकल्प आज संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणा आहे. रसायनांशिवाय फळझाडं, भाज्या, धान्य आणि चारा एकत्र कसा घेता येतो हे या शेतात स्पष्ट दिसतं. इथल्या जमिनीवर पाणी व माती जपण्यासाठी केलेले प्रयोग आता प्रशिक्षण केंद्र म्हणून वापरले जातात.

महाराष्ट्रातील प्रयोग: विदर्भ आणि मराठवाड्यातील काही शेतकरी गटांनी पावसाचं पाणी अडवून फूड फॉरेस्ट तयार करण्यास सुरुवात केली आहे. करवंद, पांगारा, करंज यांसारख्या जिवंत कुंपणाबरोबरच डाळी व भाज्या मिश्र पद्धतीनं घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी तर शेतकरी स्वतःची बियाण्यांची नर्सरी उभी करून बाहेरील महाग बियाण्यावर अवलंबन कमी करत आहेत.

हिमाचल प्रदेशातील फूड फॉरेस्ट (Attune Farm):  येथे डोंगराळ प्रदेशात पर्माकल्चर वापरून थरांवर थर अशी लागवड केली आहे. फळं, मसाले, भाज्या आणि औषधी वनस्पती एकत्र वाढवून जमिनीची उत्पादकता वाढवली आहे.

शहरी जोडणी: पुणे, मुंबईसारख्या शहरांच्या आसपास शेतकरी CSA (Community Supported Agriculture) मॉडेल वापरतात. पर्माकल्चर पद्धतीनं पिकवलेलं अन्न थेट ग्राहकांना पुरवतात. त्यामुळे शेतकऱ्याला हमीदार बाजार मिळतो आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न.

ही उदाहरणं दाखवतात की ही पद्धत फक्त “पुस्तकी” नाही तर प्रत्यक्ष शेतात जमिनीवर उतरवता येते.

शेतकऱ्यांना होणारे फायदे

  • खर्च कमी: रासायनिक खतं-कीटकनाशकांवरील खर्च घटतो, पाण्याचा वापर कमी होतो.
  • मातीचे आरोग्य सुधारते: सेंद्रिय कार्बन वाढतो, सुपीकता व ओलावा टिकतो.
  • हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता: दुष्काळ, अतिवृष्टी, तापमान बदल यांच्यातही पिकं टिकतात.
  • उत्पन्न विविधतेमुळे सुरक्षितता: एका पिकावर अवलंबून न राहता धान्य + भाज्या + फळं + पशुपालनातून वेगवेगळं उत्पन्न.
  • स्थिर रोख प्रवाह: वर्षभर काही ना काही विक्रीला तयार असल्यामुळे पैशांची गती टिकते.
  • आरोग्यदायी अन्न: शेतकरी कुटुंब आणि ग्राहक दोघांनाही सुरक्षित, पोषक अन्न मिळतं.
  • दीर्घकालीन टिकाव: माती व पाण्याचं जतन झाल्याने पुढच्या पिढीसाठी शेती चालू राहते.

पर्माकल्चर (Permaculture) ही केवळ “नवी पद्धत” नाही, तर शेतकऱ्यांच्या टिकावासाठी आणि समाजाच्या आरोग्यासाठी आवश्यक बदल आहे.

होय, सुरुवातीला मेहनत लागते, थोडा संयम हवा; पण काही महिन्यांतच खर्च घटताना दिसतो. दोन-तीन वर्षांत तर शेतकरी स्वतः अनुभवतो की माती पुन्हा जिवंत झाली, पाणी साठलं, उत्पादन विविध झालं.

आज शेतकरी ज्या संकटातून जातोय, त्याला पर्माकल्चर हा एक मजबूत पर्याय ठरू शकतो. शाश्वत शेतीचा मार्ग म्हणजे पर्माकल्चर – आणि तो मार्ग आता स्वीकारण्याची वेळ आली आहे.

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

Recent Posts

ग्रीन वॉटर म्हणजे नेमकं काय?

"पाणी म्हणजेच जीवन" हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत. पण पाण्याचे प्रकार काय असतात हे आपल्याला नेहमीच माहिती नसते.… Read More

काजवा महोत्सव: निसर्गाचा एक जादुई अनुभव

मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More

ग्वार गम: कोरडवाहू भागात सोन्यासारखा पर्याय

ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण… Read More