किड्स कॉर्नर

मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!

बालमित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्ही थंड हवामान असलेल्या उंच डोंगराळ भागात फिरायला गेलात, आणि लालभडक फुलांच्या गुच्छांनी डवरलेलं एखादं झाड पाहिलंत, तर ते नक्कीच र्‍होडोडेंड्रॉन  (Rhododendron) असू शकतं! माझं नाव थोडं कठीण वाटेल, पण गोष्ट मात्र खूप मजेदार आहे.

माझी ओळख: र्‍होडोडेंड्रॉन म्हणजे काय?

र्‍होडोडेंड्रॉन  (Rhododendron) या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतून झाली आहे. ‘Rhodon’ म्हणजे गुलाब आणि ‘Dendron’ म्हणजे वृक्ष. म्हणूनच याचा अर्थ होतो “गुलाब वृक्ष”!

मी म्हणजेच र्‍होडोडेंड्रॉन – एक सुंदर, रंगीबेरंगी फुलांनी डवरलेलं झाड. माझं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे Rhododendron आणि मी Ericaceae कुटुंबातली एक झाडांची प्रजाती आहे. माझ्या १००० पेक्षा अधिक प्रजाती आहेत, आणि मी प्रामुख्याने हिमालयाच्या थंड पर्वतीय भागात आढळतो.

माझी थोडी गंमत गोष्ट

१८४८ साली इंग्रज वनस्पतीशास्त्रज्ञ सर जोसेफ डाल्टन हूकर भारतात आले. ते हिमालयाच्या थंड भागात राहत असत, आणि तिथे त्यांनी अनेक वनस्पतींचा अभ्यास केला. त्यांचं लक्ष वेधून घेतलं माझ्यावर – र्‍होडोडेंड्रॉन वर! त्यांनी माझं बीज गोळा करून इंग्लंडला आणि आपल्या मित्र चार्ल्स डार्विनलाही पाठवलं.

हूकर सिक्कीममध्ये संशोधनासाठी गेले तेव्हा तिथल्या राजाला शंका आली की हे खरे वनस्पती अभ्यासक आहेत की गुप्तहेर? त्यामुळे काही काळ त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. पुढे ही वनस्पती जगभर प्रसिद्ध झाली!

Related Post

माझी वैशिष्ट्यं

  • माझी फुले बेलच्या आकाराची असतात.
  • फांद्यांच्या टोकाला गुच्छात उमलतात.
  • प्रत्येक फुलाला ५ पाकळ्या आणि १० पुंकेसर असतात.
  • रंग: लाल, गुलाबी, जांभळा, पांढरा, क्वचित पिवळा.
  • पाने: जाडसर, चामड्यासारखी, लांबट, खालची बाजू खवलेयुक्त.

मला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात!

माझं नाव भारत आणि नेपाळात बुरांश, बुरास, लाली गुरांस, बारहके-फूल इत्यादी आहे.

  • मी नेपाळचं राष्ट्रीय फूल आहे.
  • भारतात नागालँड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम या राज्यांचं राज्यफूल किंवा राज्यवृक्ष आहे.
  • अमेरिका (वॉशिंग्टन, वेस्ट व्हर्जिनिया) आणि दक्षिण कोरियातील जेजू प्रांताचंही मी प्रतीक आहे.

माझं स्थानिक महत्त्व

उत्तराखंडमध्ये माझं विशेष महत्त्व आहे. होळी, लग्न असे सण माझ्याविना अपूर्ण वाटतात!

  • माझ्या फुलांपासून सरबत व आरोग्यदायी पेय बनवलं जातं.
  • हार, दागिने, सजावट यासाठी वापर होतो.

माझे औषधी व औद्योगिक उपयोग

  • आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधे तयार करण्यासाठी वापरतात.
  • सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापर केला जातो.
  • SARS-CoV-2 लस संशोधनातही माझा वापर झाला.
  • काही सुरवंट व पतंगाच्या अळ्या माझ्यावर उपजीविका करतात.
  • लँडस्केपिंग मध्ये माझी सौंदर्यदृष्टीने लागवड केली जाते.

बातम्यांमध्ये का आहे मी?

अलीकडेच Botanical Survey of India ने एक नवीन अहवाल प्रकाशित केला –
Rhododendrons of Sikkim and Darjeeling Himalaya – An Illustrated Account
या अहवालातील खास मुद्दे:

  • दार्जिलिंग आणि सिक्कीममध्ये भारतातील र्‍होडोडेंड्रॉन प्रजातींपैकी ३४% आढळतात, जरी हा भूभाग देशाच्या फक्त ०.३% आहे.
  • भारतात एकूण १३२ टॅक्सा (८० प्रजाती, २५ उपप्रजाती, २७ जाती) आहेत.
  • त्यातील काही प्रजाती हवामान बदलामुळे धोक्यात आहेत – R. edgeworthii, R. niveum, R. baileyi, इ.
  • काही प्रजातींच्या अमृतात ग्रेसनोटॉक्सिन असल्याने ते जनावरांसाठी विषारी ठरू शकतात.
  • काही मधांमध्ये सौम्य भ्रामक व रेचक परिणाम होतो.
  • र्‍होडोडेंड्रॉन हवामान बदलाचे संकेतक मानले जातात.

माझ्याबद्दल काही मजेशीर गोष्टी

  • प्राचीन मूळ: माझे काही जीवाश्म तब्बल ६ कोटी वर्षे जुने आहेत!
  • काही माझ्या झाडांची उंची फक्त ४ इंच तर काही १०० फूट असते.
  • माझ्या काही प्रजातींपासून हर्बल चहा देखील तयार केला जातो.
  • जगभर वितरण: मी उत्तर अमेरिका, युरोप, आशिया येथे आढळतो, पण आफ्रिका-साउथ अमेरिका येथे नाही.
  • मला आम्लीय, चांगला निचरा होणारी माती आवडते.
  • माझ्या फुलांमुळे मधमाशा, फुलपाखरं आणि हमिंगबर्ड्स आकर्षित होतात.

शेवटी…

मी म्हणजेच र्‍होडोडेंड्रॉन – फक्त फुलांचं सौंदर्यच नाही, तर जैवविविधता, संस्कृती आणि हवामान अभ्यासाचं प्रतीक देखील आहे. तुमच्या थंड हवेच्या सफरीत माझी ओळख पटवायलाच विसरू नका!

तुम्हाला अशा गमतीशीर, विज्ञानावर आधारित निसर्गकथा आवडतात का?   मग, आमच्या बाल विभागात अधिक कथा शोधा.

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Recent Posts

उडणारी खार – झाडांवरून उडणारी ही गूढ वनवासी!

बालमित्रांनो, आपल्या आजूबाजूला झाडांवरून सरसर चढणारी, टूणटूण उड्या मारणारी छोटीशी खार आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. रामायणात रामाला रामसेतू बांधताना मदत… Read More

पॉवर वीडर आणि पॉवर टिलरबद्दल संपूर्ण माहिती

भारतातील लहान आणि मध्यम शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे आणि उत्पादन वाढवण्याच्या गरजेमुळे आता यांत्रिकीकरण… Read More

मी आहे व्हिसलर्स ऑफ द वूड्स – ढोल, शिट्टी वाजवणारा जंगली कुत्रा!

तुम्हाला कुत्रे आवडतात का? आणि हो, भुंकणाऱ्या कुत्र्यांना आपण सगळेच ओळखतो. पण कधी अशा कुत्र्यांविषयी ऐकलं आहे का जे शिट्टीसारखा… Read More