Agriculture

बजेटमध्ये फार्महाऊस कसे बांधावे?

फार्महाऊस (Farmhouse) म्हणजे आपल्या शेतात एक अशी जागा, जिथे आपण आराम करू शकतो, शेतीची देखरेख करू शकतो, तसेच सुट्टी घालवण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आणि शहरी भागात राहणारे वीकेंड फार्मर्स फार्महाऊस बांधण्याचा विचार करतात. मात्र, योग्य नियोजन नसेल तर फार्महाऊस बांधण्याचा खर्च खूप जास्त होऊ शकतो. या लेखात कमी बजेटमध्ये फार्महाऊस कसे बांधायचे ते समजून घेऊया.

फार्महाऊसची गरज कोणाला आणि का?

शेतकरी जे नियमितपणे आपल्या शेतीच्या व्यवस्थापनासाठी वेळ देतात: गावात किंवा जवळच्या शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी शेतात वेळ घालवावा लागतो. त्यासाठी एक साधे निवासस्थान उपयोगी ठरते.

वीकेंड फार्मर्स: शहरी भागात राहणारे काही लोक शेतीशी जोडलेले राहण्यासाठी किंवा व्यवसायिक कारणांमुळे शेतजमिनी घेतात. त्यांना आठवड्याच्या शेवटी निवासासाठी फार्महाऊस उपयुक्त ठरते.

पर्यटन आणि होमस्टे: काही ठिकाणी शेताच्या परिसरात नैसर्गिक सौंदर्य असल्यास, हे फार्महाऊस Airbnb किंवा होमस्टे व्यवसायासाठी वापरता येते.

फार्महाऊस बांधणे खर्चिक ठरू शकते

फार्महाऊस बांधण्याचा खर्च अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. काही लोक मोठ्या आणि आलिशान फार्महाऊसची कल्पना करतात, मात्र, लहान आणि उपयुक्त डिझाइन निवडल्यास खर्च मर्यादेत ठेवता येतो.

Related Post

महत्त्वाचे खर्चिक मुद्दे

  • डिझाइन आणि प्लॅनिंग: योग्य नियोजनानुसार दिशा निवडल्यास नैसर्गिक प्रकाश आणि वारा मिळतो, त्यामुळे विजेचा खर्च कमी होतो.
  • छप्पराचा प्रकार: साधे पत्रा छप्पर, कौलारू छप्पर, किंवा काँक्रीट स्लॅब यावर खर्च ठरतो. कौलारू छप्पर थोडे महाग असते पण उन्हाळ्यात उष्णता कमी ठेवते.
  • साहित्य खरेदी: विटा, सिमेंट, लाकूड आणि लोखंडाचे दर ठिकाणी वेगळे असतात. योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी खरेदी केल्यास बचत होते.
  • वीजपुरवठा: बहुतेक शेतात केवळ शेतीसाठी वीजपुरवठा (8 तास) असतो, घरगुती वीजसाठी वेगळा ट्रान्सफॉर्मर बसवावा लागू शकतो, ज्याचा खर्च अधिक असतो. सोलर पॅनल हा चांगला पर्याय ठरू शकतो.
  • पाण्याचा स्रोत: विहीर किंवा बोअरवेल असणे आवश्यक आहे. पाण्याच्या साठवणुकीसाठी एक टाकी बांधणे फायदेशीर ठरते.
  • सुरक्षितता: फार्महाऊस बांधण्याआधी शेताची कुंपण (फेन्सिंग) पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा अज्ञात लोकांचा आणि प्राण्यांचा त्रास होऊ शकतो.

योग्य डिझाइनद्वारे खर्च कमी करा

मोठ्या फार्महाऊसऐवजी १ BHK निवडा:

  • फार्महाऊस हे प्रामुख्याने विश्रांतीसाठी वापरण्यात येणार असल्यामुळे एक स्वयंपाकघर, एक बेडरूम आणि एक हॉल पुरेसा होतो.
  • मोठ्या रचनेपेक्षा सुटसुटीत आणि खर्चिकदृष्ट्या योग्य रचना फायदेशीर ठरते.

स्टोअर रूम आणि लेबर रूम:

  • शेतीसाठी लागणाऱ्या साधनांसाठी स्टोअर रूम आवश्यक असते.
  • जर शेतावर कायमस्वरूपी मजूर ठेवायचा असेल, तर वेगळ्या मजूर खोलीची सोय आवश्यक आहे.

योग्य कंत्राटदार निवडणे

कामाचा संपूर्ण ठेका की केवळ मजुरीचा ठेका?

  • काही कंत्राटदार फक्त कामाचे ठेके घेतात आणि मालकाने स्वतः साहित्य खरेदी करावे लागते.
  • काही संपूर्ण बांधकामासोबत साहित्यही पुरवतात, पण यात खर्च वाढतो.
  • तुमच्याकडे वेळ असेल, तर स्वतः साहित्य खरेदी करून मजुरीचे कंत्राट देणे स्वस्त ठरू शकते.

स्थानीय कामगार वापरणे:

  • गावातील स्थानिक कारागीर आणि मजूर स्वस्तात चांगले काम करतात.
  • बाहेरच्या कंत्राटदारांपेक्षा स्थानिकांना काम दिल्यास वाहतूक खर्च वाचतो.

शेतात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा

वीजपुरवठ्याचे पर्याय:

  • सोलर पॅनेल: वीजपुरवठा नसल्यास सौरऊर्जा हा स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय ठरतो.
  • जनरेटर: तात्पुरत्या वापरासाठी.
  • शासकीय योजनांची माहिती घ्या: घरगुती वीजपुरवठ्यासाठी काही शासकीय योजना उपलब्ध असतात.

पाणीपुरवठा:

  • विहीर असेल तर सोलर पंप किंवा मोटारसह याचा वापर करता येतो.
  • बोअरवेल हा जास्त खोल पाण्याचा स्रोत मिळवण्यासाठी उपयुक्त पर्याय असतो.

फार्महाऊस बांधताना योग्य नियोजन केल्यास खर्च नियंत्रित ठेवता येतो आणि शेतकऱ्यांसाठी तसेच शहरी वीकेंड फार्मर्ससाठी ते अत्यंत उपयोगी ठरते. मोठ्या आणि खर्चिक डिझाइनपेक्षा लहान व उपयुक्त रचना अधिक फायदेशीर ठरते. वीज आणि पाणीपुरवठ्याच्या उपलब्धतेवर आधारित निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, तसेच शेताच्या सुरक्षिततेसाठी कुंपण आधीच उभारणे आवश्यक आहे. स्थानिक कामगार आणि योग्य ठेकेदार निवडल्यास काम अधिक सोपे आणि किफायतशीर होऊ शकते. तसेच, नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करून पर्यावरणपूरक आणि दीर्घकाल टिकणारे फार्महाऊस उभारता येते. जर फार्महाऊस नैसर्गिक सौंदर्यस्थळी असेल, तर ते Airbnb किंवा होमस्टे व्यवसायासाठी देखील उपयोगी ठरू शकते. थोडे नियोजन आणि बचतीच्या उपायांसह तुम्ही कमी बजेटमध्ये फार्महाऊस बांधू शकता!

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

View Comments

Recent Posts

काजवा महोत्सव: निसर्गाचा एक जादुई अनुभव

मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More

ग्वार गम: कोरडवाहू भागात सोन्यासारखा पर्याय

ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण… Read More

इथेनॉल उत्पादनात भारताची वाटचाल: संधी, स्थान आणि सावधगिरी

भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण… Read More